फातिमा शेख,एक भारतीय महिला समाजसुधारक. इतर अनेक भारतीय महिला सुधारकांप्रमाणेच त्या इतिहासात अज्ञान आणि अज्ञात राहिल्या आहेत. भारतातील पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्याला फातिमामाई शेख यांच्याबद्दल थोडेसेच माहीत आहे. ते म्हणजे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्यासोबत सहशिक्षिका म्हणुन शिक्षणामध्ये त्यांचे योगदान.
भारताच्या समाजसुधारणा चळवळीत महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुलींसाठी शाळा सुरू करत असताना व त्यांना शिक्षण देत असताना समाजाकडून खुप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला व त्यांना देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा बहुमान मिळाला.या सर्व शैक्षिणक प्रवासामध्ये त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे फातिमामाई शेख यांची.
जेव्हा फुले दाम्पत्यांनी दीन-दलितांना व विशेषतः स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांना ही प्रथा बंद करण्यास किंवा समाज व घर सोडून जाण्यास सांगितले गेले. तेव्हा या जोडप्याने स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी फातिमामाई शेख व त्यांचा भाऊ उस्मान शेख यांनी फुले दाम्पत्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. महात्मा जोतिबा फुले आणि सावत्रीमाईंना जो विरोध झाला, तो फातिमामाई शेख साठी सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात वाढला. त्यांनी सावत्रीमाईंना त्यांच्या स्वतःच्या घरात "स्वदेशी ग्रंथालय" (Indeginious Library) सुरू करण्यास मदत केली.त्या उच्चवर्णीय हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्याही विरोधात जात असत.या दोन्हीं गटांना शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यास अत्यंत भीती वाटत होती व सर्वात मोठी अडचण म्हणजे स्त्रियांना शिक्षण देणे हे त्यावेळी त्या दोन्हीं गटांना मान्य नव्हते. स्त्री ला समाजात दुय्यम स्थान दिले जात होते. तसेच स्त्री म्हणजे फक्त चुल आणि मुल हाच स्त्रीचा धर्म आहे असे त्यांचे मत होते. शिक्षण घेणे हे केवळ उच्चवर्णीय पुरुषांचाच हक्क आहे असे मानत होते. परंतु समाजातील सर्व रूढी व परंपरांना झुकारुन फातिमामाई आणि सावित्रीमाई यांनी शाळा सुरू केली.शेख व सावित्रीमाई फुले यांनी दोघींनी सिंथिया फरार या अमेरिकन मिशनरीद्वारे चालवल्या जाणार्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत दाखल झाले व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येथे प्रशिक्षण सुद्धा यशस्वीपणे पूर्ण केले होते. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी शिकवले आणि सर्व धर्म आणि जातींच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये शेख यांनी मुंबई (तत्कालीन बॉम्बे) येथे दोन शाळांच्या स्थापनेत भाग घेतला.
या शाळा सुरू झाल्यानंतर उच्चवर्णीय लोकांनी तीव्र आणि हिंसक प्रतिक्रिया दिल्या. ते जात असताना त्यांनी फातिमामाई आणि सावित्रीमाई यांच्यावर दगडफेक व शेणही फेकले, मात्र या दोन्हींही महिला न घाबरता,न डगमगता त्यांनी स्त्रियांना शिकविण्याचे काम बिनधास्तपणे करत राहिल्या. फातिमामाई शेख यांनी १८५६ पर्यंत शाळेत शिकविण्याचे अखंडित काम केले आणि त्यांना भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका म्हणून आदराने पाहिले जाते. अशा शिक्षणपप्रेमी समाजसुधारक फातिमामाई शेख यांना विनम्र अभिवादन.